



निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित
अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध बाल कायदे, बालहक्क आणि बालसुरक्षितता याविषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. उदय जिनगे यांनी विद्यार्थ्यांना पोस्को कायदा (बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा), बालकामगार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा यांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय बालकांचे मूलभूत हक्क, शिक्षणाचा अधिकार, बालकांसाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतुदी, शासकीय सुविधा व कायदेशीर संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.
बालकांचे शोषण, बालकामगार प्रथा, बालविवाह आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या सामाजिक समस्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे होते.
कोणत्याही अनुचित प्रसंगात न घाबरता पालक, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्ही. डी. इंदलकर, टी. ए. घोसरवाडे, एस. डी. टी. ए. देसाई यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पी. बी. कळंत्रे यांनी सूत्रसंचालन केले. एस. डी. खोत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta