



बलभीम मराठी साहित्य संघाच्या बैठकीत निर्णय; संमेलनाच्या तयारीला लवकरच प्रारंभ
कुद्रेमानी : येथील बलभीम मराठी साहित्य संघातर्फे आयोजित करण्यात येणारे २१ वे मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडणार आहे. मराठी साहित्याची परंपरा जपण्याबरोबरच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय साहित्य संघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
मराठी साहित्य संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी रात्री साहित्य संघाच्या कार्यालयात पार पडली. संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर २१ वे मराठी साहित्य संमेलन १३ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीत संमेलनातील विविध साहित्यिक सत्रांचे नियोजन, संमेलनाध्यक्षांची निवड, तसेच व्याख्याते, कथाकार, कवी आणि अन्य मान्यवर पाहुण्यांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा झाली. संमेलन अधिक दर्जेदार आणि साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरेल, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यावर उपस्थितांनी भर दिला.
यावेळी नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, शिवाजी मुरकुटे, शांताराम गुरव, दत्ता कांबळे, महादेव गुरव, परशराम पाटील, अजित सुतार, प्रशांत सुतार, अनंत लोहार, शैलेश गुरव, उमेश गुरव, विशाल गुरव, मारुती पाटील, दीपक मराठे, विशाल हुलजी आदींनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सूचना मांडल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या बलभीम मराठी साहित्य संघाच्या वतीने यंदाचे २१ वे संमेलनही उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात साजरे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्यासह मराठी भाषेच्या संवर्धनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta