



विराट हॉटेलचे मालक कपील भोसले यांना धमकावल्याचा दावा; मराठी समाजाने व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन
बेळगाव : काळा दिनानिमित्त आयोजित रॅलीत सहभागी झाल्यामुळे मराठी व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विराट हॉटेलचे मालक कपील भोसले यांनाही रॅलीतील सहभागामुळे लक्ष्य केले जात असल्याचा दावा मराठी भाषिकांकडून करण्यात आला आहे.
कपील भोसले यांना प्रशासनाकडून फोन करून धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप असून, काही सोशल मीडिया पेजवरून त्यांच्या व्यवसायाविरोधात पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठी व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल काळा दिनाच्या रॅलीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने एकजूट दाखवली. त्याच एकजुटीचे दर्शन आता मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहताना घडविण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. मराठी व्यावसायिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर त्याचे पडसाद सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उमटू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
कपील भोसले असोत किंवा अन्य कोणताही मराठी व्यावसायिक, केवळ काळा दिनाच्या रॅलीत सहभागी झाल्यामुळे कोणालाही त्रास दिला जात असेल, तर संपूर्ण मराठी समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta