Friday , November 6 2026
Breaking News

मराठी व्यावसायिकांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू; रमाकांत कोंडुसकर यांचा इशारा

Spread the love

 

कपिल भोसले यांच्या पाठीशी मराठी भाषिकांची एकजूट

बेळगाव : काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्यामुळे मराठी व्यावसायिकाला लक्ष्य करून धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल विराटचे मालक कपिल भोसले यांना हॉटेल बंद पाडण्याची तसेच अधिकाऱ्यांकडे तक्रार करून परवाना रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी हॉटेल विराट येथे धाव घेत भोसले यांना पाठिंबा दर्शविला.

१ नोव्हेंबर रोजी झालेल्या काळ्या दिनाच्या फेरीत कपिल भोसले सहभागी झाले होते. याचाच राग मनात धरून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचा प्रत्येकाला अधिकार असताना, केवळ फेरीत सहभागी झाल्यामुळे व्यावसायिकाला धमकावणे आणि त्याच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू : कोंडुसकर

या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रमाकांत कोंडुसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमचा लढा केंद्र सरकारच्या विरोधात आहे. १९५६ पासून आम्ही १ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन पाळत आहोत. या फेरीत असंख्य मराठी भाषिक सहभागी होतात. कपिल भोसले हेदेखील फेरीत सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.”

“बेळगावातील व्यावसायिक महापालिकेच्या नियमावलीनुसार परवाने घेऊन व्यवसाय करतात. नियमांनुसारच फलक लावले जातात. असे असतानाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही सर्वजण आमच्या व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्रास देण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू!

प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कोणत्याही व्यावसायिकाला विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. धमकावण्याचे प्रकार सुरूच राहिल्यास समस्त मराठी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.

कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या घटनेची माहिती मिळताच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी हॉटेल विराट येथे एकत्र येत कपिल भोसले यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी सागर पाटील, गणेश दड्डीकर, बळवंत शिंदोळकर, सुनील बोकडे, किरण हुद्दार, शेखर तळवार, प्रवीण रेडेकर, सूरज चव्हाण, गजानन बैलुरकर, राकेश पाटील, सुमित मोरे, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम, आकाश भेकणे, राजू वर्पे, प्रियेश गौंडाडकर, जयदीप उपसकर, राजेंद्र बैलुर, श्रीपाद काकतीकर, जयेश भातकांडे, दर्शन सावगावकर आदी उपस्थित होते.

कपिल भोसले यांच्या पाठीशी उभे राहत मराठी भाषिकांनी एकजुटीचे दर्शन घडविले. व्यावसायिकांना धमकावून दबाव निर्माण करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा ठाम संदेश या उपस्थितीतून देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *