Friday , November 6 2026
Breaking News

इंद्रायणी भाताला प्रतिक्विंटल सात हजारांचा दर द्या!; योग्य भाव मिळेपर्यंत विक्री न करण्याचा कडोलीतील शेतकऱ्यांचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : इंद्रायणी भाताला प्रतिक्विंटल सात हजार रुपये दर द्यावा, पोत्यामागे कोणत्याही प्रकारची वजनकपात करू नये तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या वजनकाट्यावरच भाताचे वजन करून खरेदी करावी, अशा प्रमुख मागण्यांचे ठराव कडोली येथे झालेल्या शेतकरी एल्गार बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. योग्य दर मिळाल्याशिवाय भाताची विक्री करणार नाही, असा ठाम निर्धारही यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

कडोली येथील रेणुका मंदिराच्या प्रांगणात शेतकरी एल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी भात उत्पादनासाठी येणारा वाढता खर्च आणि व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. भात लागवडीसाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशके तसेच मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लागवडीपासून पीक काढणीपर्यंत एकरी साधारण ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र, व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी दर आणि वजनातील कपात यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नसल्याची व्यथा उपस्थितांनी मांडली.

यापूर्वी व्यापाऱ्यांकडून प्रत्येक पोत्यामागे दोन ते पाच किलोपर्यंत भाताची सूट घेतली जात होती. त्याचबरोबर वजनकाट्यातही काटामारी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही विक्रीच्या वेळी होणाऱ्या या कपातीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या दराच्या मागणीबाबत राईस मिलमधील वरिष्ठ व्यापाऱ्यांना माहिती देऊन चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन व्यापारी तौसिफ ताशिलदार यांनी दिले. भाताचा दर निश्चित करण्यासाठी तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांची लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

यावेळी अरुण पाटील, शिवाजी कुटे, पी. डी. पाटील, शिवाजी डोंगरी पाटील, नारायण पाटील, श्रीकांत कडुलकर, महादेव संभाजी आदींनी मार्गदर्शन केले.

उत्पादन खर्च वाढला, मात्र शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे इंद्रायणी भाताला प्रतिक्विंटल सात हजार रुपये दर मिळेपर्यंत भाताची विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. ‘योग्य भाव द्या, अन्यथा भाताची विक्री नाही’, असा स्पष्ट इशाराच या बैठकीतून व्यापाऱ्यांना देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *