Friday , November 6 2026
Breaking News

मुडलगी दरोडा प्रकरणाचा छडा; सात जणांना अटक

Spread the love

 

२ कोटी ३९ लाखांची रोकड जप्त; आणखी दोघे फरार  – जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांची माहिती

बेळगाव : मुडलगी येथे २ कोटी ६८ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याच्या प्रकरणाचा मुडलगी पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली आणि एका कारसह अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीतील आणखी दोघे जण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

३० ऑक्टोबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मुडलगी येथे डोळ्यांत मिरची पूड टाकून मारहाण करत पाच बॅगांमध्ये ठेवलेली २ कोटी ६८ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. याप्रकरणी कलमेश बसवराज रंगापूर यांनी मुडलगी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या दरोड्याचा उलगडा केला.

आमिष दाखवून जमवली २ कोटी ६८ लाखांची रक्कम

या प्रकरणातील मुख्य संशयित चिदानंद सिद्धारूढ कुरबेट याने एक लाख रुपये दिल्यास बँक खात्यात एक लाख ३० हजार रुपये जमा करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून कलमेश रंगापूर यांनी ४८ लाख रुपये, त्यांचे मामा बसाप्पा यांनी ४० लाख रुपये, बीराप्पा वनसनी यांनी ५० लाख रुपये, कलमेश गोकाक यांनी ५० लाख रुपये आणि शंकर जगन्नावर यांनी ८० लाख रुपये दिले होते. अशा प्रकारे एकूण २ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती.

इतकी मोठी रक्कम जमा झाल्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे जमा करावे लागणार असल्याचे चिदानंद कुरबेट याच्या लक्षात आले. त्यामुळे ही रक्कम परत करण्याऐवजी त्याने स्वतःच दरोड्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

शेडमध्ये नोटा मोजण्याचे ठरवून रचला कट

या कटाचा एक भाग म्हणून ३० ऑक्टोबर रोजी बीराप्पा वनसनी यांच्या शेडमध्ये जमा झालेली रक्कम मोजण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीनही मागविण्यात आल्या होत्या. शेडमध्ये नोटांची मोजणी सुरू असताना पूर्वनियोजित कटानुसार मारुती अरभावी, संजू अरभावी, राजाराम माळ्यागोळ आणि अन्य तीन ते चार साथीदारांनी तेथे धाड टाकली.

यावेळी चन्नबसप्पा यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पाच बॅगांमध्ये ठेवलेली २ कोटी ६८ लाख रुपयांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले होते.

सात जणांना अटक; दोघांचा शोध सुरू

या प्रकरणी चिदानंद सिद्धारूढ कुरबेट, संजीव रामाप्पा अरभावी, राजाराम सुरेश माळ्यागोळ, रमेश धुंडाप्पा माळ्यागोळ, विठ्ठल सुरेश माळ्यागोळ, प्रकाश राम लिंगप्पा मिळवकी आणि राघवेंद्र प्रकाश कोप्पद या सात जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व गोकाक व मुडलगी तालुक्यातील रहिवासी आहेत.

या टोळीतील रामाप्पा तळवार आणि मारुती अरभावी हे दोघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या सातही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये जप्त केले असून, उर्वरित रकमेबाबत तसेच एवढी मोठी रक्कम जमा होण्यामागील व्यवहारांबाबत पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *