



जनतेच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी काँग्रेस सरकारने वाढविला आर्थिक बोजा : टीका
बेळगाव : दूध, दही, बस तिकीट यांसह जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या दरात करण्यात आलेली वाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी. सर्वसामान्य जनतेवरील आर्थिक भार कमी करून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरण जाधव यांनी केली आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि परिवहन सेवांचे दर वाढवून सर्वसामान्यांचे जगणे अधिक कठीण केले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर दरवाढीचा अतिरिक्त बोजा टाकून सरकारने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस सरकारला शेतकऱ्यांविषयी खरोखरच कळकळ असती, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी दुष्काळ निवारण मदत दिली असती. दूध उत्पादकांना होणारा तोटा सरकारने स्वतः सहन करायला हवा होता. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेवर दरवाढीचा बोजा टाकणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्याऐवजी काँग्रेस सरकार अनावश्यक विषयांमध्येच वेळ घालवत आहे. जनतेच्या मूलभूत आणि वास्तविक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. काँग्रेस सरकार राज्यातील जनतेसाठी शाप ठरले असून, हे सरकार सत्तेतून कधी पायउतार होणार, याची जनता वाट पाहत आहे, असा संताप किरण जाधव यांनी व्यक्त केला.
जनविरोधी दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta