



सोलार पंपसेट मंजूर झाल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांची फसवणूक; फेसबुकवरील जाहिरातीचा वापर
बेळगाव : पीएम किसान योजनेअंतर्गत सोलार पंपसेट देण्याचे आमिष दाखवून कित्तूर तालुक्यातील उगरखोड येथील एका वृद्ध शेतकऱ्याची सायबर गुन्हेगारांनी १ लाख १३ हजार ३८८ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी मैत्री असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ८ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या फेसबुकवर पीएम किसान योजनेअंतर्गत सोलार पंपसेटसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची जाहिरात दिसली. या योजनेत शेतकऱ्यांनी केवळ १० टक्के रक्कम भरायची असून उर्वरित ९० टक्के रक्कम सरकार भरणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते.
या जाहिरातीवर विश्वास ठेवून शिवाजी यांनी त्यातील लिंक उघडून अर्ज भरला. त्याच दिवशी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरल्यामुळे आधारकार्ड, पॅनकार्ड, जमिनीचा उतारा आणि बँक पासबुक आदी कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी सर्व कागदपत्रे पाठविली.
यानंतर रजिस्ट्रेशन फी म्हणून ८ हजार ५०० रुपये फोन-पेद्वारे पाठविण्यास सांगण्यात आले. १० ऑगस्ट रोजी त्यांनी ही रक्कम भरली. त्याबदल्यात सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपवर पावत्याही पाठविल्या. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याची त्यांना शंका आली नाही.
काही दिवसांनी पुन्हा फोन करून तुमच्या नावावर सोलार पंपसेट मंजूर झाला असून, दहा टक्के आगाऊ रक्कम आणि जीएसटी भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वेगवेगळी कारणे देत तीन टप्प्यांत त्यांच्याकडून आणखी पैसे उकळण्यात आले. अशा प्रकारे एकूण १ लाख १३ हजार ३८८ रुपये उकळल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी संपर्क तोडला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिवाजी यांनी जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta