



शिवरायांच्या पराक्रमाला बालचमूंचा मानाचा मुजरा; दिवाळीनिमित्त अभिनव उपक्रम
बेळगाव : स्वराज्याची ऐतिहासिक परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा अभिमान आणि भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत केएलएस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. शिवरायांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणारा हा अभिनव उपक्रम शाळेत उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी आवड निर्माण होण्याबरोबरच त्यांच्यातील कल्पकता, सर्जनशीलता आणि सांघिक कार्याची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेतर्फे गडकिल्ले निर्मितीचे आव्हान देण्यात आले होते. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांनी एका किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्यांची वैशिष्ट्ये आणि बांधकामातील बारकावे लक्षात घेऊन या प्रतिकृती पूर्ण केल्या.
चिखल, माती, दगड, विटा आणि काट्याकुट्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी शिवनेरी, प्रतापगड, रायगड, सिंहगड, देवगिरी, चित्रदुर्ग, लोहगड, राजहंसगड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या गडकिल्ल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सांघिक प्रयत्नांतून साकारलेल्या या कलाकृतींमधून शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्याप्रति असलेला आदर व्यक्त झाला.
दिवाळीच्या सणात गल्लीबोळांत गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जाते. याच परंपरेला शालेय उपक्रमाची जोड देत केएलएस स्कूलने विद्यार्थ्यांना इतिहासाशी जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. ऐतिहासिक मालिकांचा अभ्यास, इंटरनेट, मोबाईल, गडकिल्ल्यांवरील पुस्तके तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
पाठ्यपुस्तकांतील इतिहास केवळ वाचण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. ज्ञानमंदिरात उभारलेल्या या ऐतिहासिक प्रतिकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला बालचमूंनी वाहिलेली आगळीवेगळी मानवंदनाच ठरली. अशा उपक्रमांतून ऐतिहासिक वारशाची जाणीव आणि स्वराज्याचा अभिमान नव्या पिढीत रुजविण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
Belgaum Varta Belgaum Varta