Sunday , November 22 2026
Breaking News

आमदार रमेश जारकीहोळी यांच्या अंगरक्षकाकडूनच दरोड्याचा प्रयत्न; सात जणांना अटक 

Spread the love

 

२.३९ कोटी रुपये जप्त, आणखी एका आरोपीचा शोध सुरू

बेळगाव : माजी मंत्री तथा गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या अंगरक्षकानेच पैशांची दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २.६८ कोटी रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंगरक्षकासह सात जणांना अटक केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगीनगरात ३० ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला असून, तो उशिरा उघडकीस आला आहे. चिदानंद कुरबेट असे अटक करण्यात आलेल्या अंगरक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह संजीव अरभावी, राजाराम, रमेश माळ्यागोळ, प्रकाश, राघवेंद्र कोप्पद आणि रामाप्पा तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलमेश नामक व्यक्तीची शिवम असोसिएटमध्ये आर्थिक फसवणूक झाली होती. याची माहिती असलेल्या चिदानंद कुरबेट याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. एक लाख रुपयांमागे ३० हजार रुपये अतिरिक्त देण्याचे प्रलोभन त्याने दाखविले. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कलमेश याने बँका, पतसंस्था आणि मित्रांकडून तब्बल २.६८ कोटी रुपये जमा केले.

त्यानंतर पैसे मोजण्याच्या बहाण्याने आरोपींनी कलमेश यांना एका शेडमध्ये बोलावले. पैसे घेऊन तेथे पोहोचताच आरोपींनी शेडवर हल्ला करून त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली आणि मारहाण करत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कलमेश यांनी खबरदारी म्हणून शेडच्या परिसरात काही तरुणांना पहाऱ्यासाठी ठेवले होते. त्यामुळे आरोपींचा डाव उधळला गेला. तरुणांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या कारवाईत पोलिसांनी २.३९ कोटी रुपये जप्त केले आहेत. उर्वरित रकमेचा शोध सुरू असून, आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आमदार रमेश जारकीहोळी यांच्या अंगरक्षकाला या प्रकरणात अटक झाल्यानंतर बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी त्याला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास मूडलगी पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *