Sunday , November 22 2026
Breaking News

खानापूर-चोर्ला मार्गावर दुचाकी आणि मिनी व्होल्वो बसची भीषण धडक; २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

Spread the love

 

खानापूर : दिवाळीचा सण कुटुंबीयांसमवेत आनंदात साजरा करण्यासाठी गोव्याहून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या तरुणाच्या प्रवासाचा दुर्दैवी शेवट झाला. खानापूर-चोर्ला मार्गावरील कालमणी गावाजवळ रविवारी सकाळी दुचाकी आणि मिनी व्होल्वो टुरिस्ट बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश परशराम मादार (वय २७, रा. ढोकेगाळी, ता. खानापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. सणासुदीच्या आनंदात घरी परतणाऱ्या महेशच्या मृत्यूच्या वृत्ताने ढोकेगाळीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

सणासाठी निघाला, पण घरी पोहोचलाच नाही!

मिळालेल्या माहितीनुसार, महेश मादार हा गोव्यातील विमानतळावर कायमस्वरूपी नोकरीला होता. दिवाळीच्या सणानिमित्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करण्यासाठी तो रविवारी सकाळी दुचाकीवरून गोव्याहून आपल्या ढोकेगाळी येथील घराकडे निघाला होता. मात्र, खानापूर-चोर्ला मार्गावरील कालमणी गावाजवळ त्याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या मिनी व्होल्वो टुरिस्ट बसशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, महेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

अपघाताची घटना घडताच घटनास्थळी उपस्थित असलेले काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांनी प्रसंगावधान राखत तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच महेशची प्राणज्योत मालवली होती. दिवाळीच्या सणासाठी घरी परतणाऱ्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

अपघाताची माहिती मिळताच खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे ढोकेगाळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *