Sunday , November 22 2026
Breaking News

नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजनाचा दुहेरी मंगलयोग; दीपावलीचा उत्साह द्विगुणित

Spread the love

 

 

बेळगाव : दीपावलीच्या मंगलमय पर्वाला प्रारंभ झाला असून, यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा दुहेरी योग एकाच दिवशी जुळून आल्याने सणाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. पहाटे अभ्यंगस्नान, नवीन वस्त्रांची परिधान, पारंपरिक फराळाचा आस्वाद आणि सायंकाळी लक्ष्मीपूजन अशा धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात बेळगावकरांनी दीपावलीचा आनंद साजरा केला.

वसुबारस आणि धनत्रयोदशीच्या उत्साहानंतर नरक चतुर्दशीच्या निमित्ताने पहाटेपासूनच घराघरांत लगबग पाहायला मिळाली. सुगंधी उटणे, तेलस्नान आणि अभ्यंगस्नानाची पारंपरिक प्रथा उत्साहात पार पडली. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करून दिवाळीचा आनंद लुटला. सायंकाळी लक्ष्मीपूजनानिमित्त घराघरांत दीपप्रज्वलन, आकर्षक रोषणाई आणि पूजाविधी पार पडल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले.

दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण दिसून आले. कपडे, दागिने, मिठाई, फराळाचे साहित्य, आकाशकंदील, विद्युत रोषणाईच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. व्यापारी वर्गासाठी आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सणामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.

मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, तर बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी होणार आहे. त्यानंतर शनिवार, दि. २१ नोव्हेंबरपासून तुलसी विवाह सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.

एकूणच, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दुहेरी मंगलयोगामुळे यंदाच्या दीपावलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भक्तिभाव, परंपरा, कौटुंबिक स्नेह आणि खरेदीचा उत्साह अशा वातावरणात दीपोत्सवाचा आनंद सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *