






‘सिलिकॉन चिप’ संशोधन; समीना मुल्ला यांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : बेंगळुरू येथील ‘जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राच’ सहाय्यक प्रा.डॉ. अभिषेककुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने भविष्यातील ६ जी तंत्रज्ञानासाठी वेगवान नवी सिलिकॉन चिप विकसित केली आहे. या जागतिक स्तरावरील संशोधनाच्या पथकात निपाणी येथील समीना मुल्ला (भारत सरकारच्या डीएसटी इन्स्पायर फिलो )यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.त्यांच्या या यशाने निपाणीसह बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
समीना मुल्ला यांच्या कुटुंबाची परिस्थिती सामान्य आणि हलाखीची आहे. कठीण कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढत त्यांच्या आईने त्यांना उच्च शिक्षण दिले. समीना यांनी प्राथमिक शिक्षण निपाणी येथे पूर्ण केले. त्यानंतर येथील के.एल.ई. जी.आय. बागेवाडी महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी घेतली. पुढे बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातून सुवर्णपदकासह एम.एस्सी. पदवी संपादन करून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.
वरील महत्त्वपूर्ण संशोधन ‘अॅडव्हान्स्ड मटेरियल्स’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
या चिपद्वारे प्रति सेकंद १०० गिगाबिट इतक्या प्रचंड वेगाने डेटा पाठवता येतो. या वेगामुळे ५ जीबीचा एचडी चित्रपट अवघ्या अर्ध्या सेकंदापेक्षाही कमी वेळात डाऊनलोड होऊ शकतो. ६जी नेटवर्क टेराहर्ट्झ लहरींवर चालते, ज्यामध्ये वळण किंवा अडथळा आल्यास सिग्नल कमकुवत होतो. मात्र या चिपमध्ये सिलिकॉनवर त्रिकोणी छिद्रांची खास रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे अडथळा आल्यानंतरही सिग्नलमध्ये केवळ १ ते २ टक्केच घट होते.
समीना यांच्या या देदीप्यमान यशामुळे निपाणी परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या आदर्श ठरल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta