






रोहन साळवे यांचे आवाहन ; बहुमताचा कौल डावलण्याचा प्रयत्न अन्यायकारक
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा आधार आहे. आजतागायत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गोकुळचा कारभार सांभाळला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीला बहुमत मिळूनही सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत तांत्रिक कारणांचा आधार घेत अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप येथील युवा उद्योजक रोहन साळवे यांनी केला आहे. गोकुळचा कारभार सभासदांच्या इच्छेनुसार, लोकशाही तत्त्वांनुसार चालावा, यासाठी सोमवारी (ता.९) आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष मोर्चात निपाणीसह सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
साळवे म्हणाले,केवळ कोरमचे तांत्रिक कारण पुढे करून सभा पुढे ढकलणे आणि त्याच दरम्यान शासकीय संचालकांची निवड करून त्यांना मतदानाचा अधिकार देणे, हा प्रकार सभासदांनी दिलेल्या बहुमताच्या कौलाचा अवमान करणारा आहे. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालणे अपेक्षित असताना बहुमताच्या निर्णयाला बाजूला सारण्याचे प्रयत्न होणे योग्य नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली लोकशाही मूल्ये आणि त्यानुसार चालणारी व्यवस्था कायम ठेवण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गोकुळ दूध संघाचे महत्त्व कोल्हापूर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीही तेवढेच आहे. निपाणीसह सीमाभागातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे दीड लाखावर लिटर दूध गोकुळला पुरवठा केले जाते. अशा परिस्थितीत गोकुळमध्ये निवडणुकीतून मिळालेला लोकशाही पद्धतीचा बहुमताचा कौल डावलण्याचे प्रयत्न होत असतील, तर त्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन रोहन साळवे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta