Sunday , November 22 2026
Breaking News

पोटच्या मुलाच्या हत्येचा आईनेच रचला कट; प्रियकरासह सहा जणांना अटक

Spread the love

 

झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून हत्या, मृतदेह गटारात फेकला

बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाच्या हत्येचा कट आईनेच रचल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या घडवून आणल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी आईसह सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे उघड झाले असून, एकूण सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

३ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गाशेजारी केएलई छत्रीजवळील गटारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील मीना नारायण (वय ४४) यांनी पोलिसांशी संपर्क साधून मृतदेह आपला मुलगा विजय नारायण (वय २४) याचा असल्याचे ओळखले. राकेश नामक व्यक्ती २८ ऑक्टोबर रोजी आपल्या कारमधून विजयला बेंगळुरूहून बेळगावला घेऊन आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून संशयितांचा शोध सुरू केला.

पोलिसांच्या तपासात मृत विजयची आई मीना नारायण हिचे राकेश परशुराम जमुनी (वय ३४) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने मीनानेच राकेशला विजयच्या हत्येस सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार राकेशने साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट अंमलात आणला.

आरोपींनी विजयला कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून पाजल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बेळगाव राष्ट्रीय महामार्गाशेजारील केएलई छत्रीजवळच्या गटारात टाकून देण्यात आला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

या प्रकरणी मीना नारायण, राकेश परशुराम जमुनी, सचिन मल्लाप्पा कांबळे, मनोज दुंडाप्पा कांबळे, तम्मण्णा रवींद्र कांबळे आणि एकनाथ उमाप्पा कांबळे या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्धही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय आणखी एका संशयिताची ओळख पटली असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या गुन्ह्याचा तपास माळमारुती पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आनंद अदागोंडा, सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. एफ. बस्तवाड यांच्यासह पोलीस पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी तपास पथकाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *