






तीन महिने मोफत रेशन आणि टेलरिंग बॅग निर्मितीचे दाखविले स्वप्न; पैसे घेऊन संशयित महिला पसार
बेळगाव : मोफत रेशन आणि घरबसल्या गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवत खानापूर तालुक्यातील तब्बल ६६२ महिलांची ७ लाख ९४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरमहा १२०० रुपये भरल्यास तीन महिने मोफत रेशन आणि टेलरिंग बॅग तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल देण्याचे आश्वासन देत एका महिलेने महिलांकडून पैसे उकळले. मात्र, रक्कम जमा होताच कार्यालय बंद करून संशयित महिला पसार झाली. याप्रकरणी खानापूर पोलिसांत झिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी प्रकरण टिळकवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
याप्रकरणी इस्पोलिना अल्मिदा (रा. मनसापूर, ता. खानापूर, सध्या रा. आगरकर रोड, टिळकवाडी) यांनी सफिना जोसेफ (रा. बेंगळूर) या महिलेविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी या यापूर्वी मनसापूर गावातील स्त्री शक्ती संघाच्या प्रतिनिधी होत्या. तसेच खानापूर येथील सीडीपीओ कार्यालयांतर्गत स्त्री शक्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. याच परिचयाचा आधार घेत संशयित महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना विविध सुविधा आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तिने सांगितले.
ओळखीतील महिलांना प्रत्येकी १२०० रुपये भरून ट्रस्टचे सदस्य करून घेतले जाईल. त्याबदल्यात तीन महिने मोफत रेशन देण्याबरोबरच टेलरिंग बॅग तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल पुरवून घरबसल्या गृहउद्योग उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रलोभन दाखविण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे आश्वासन दिल्याने अनेक महिलांनी या योजनेवर विश्वास ठेवला.
या विश्वासाचा गैरफायदा घेत संशयित महिलेने मनसापूर आणि परिसरातील तब्बल ६६२ महिलांकडून प्रत्येकी १२०० रुपयांप्रमाणे एकूण ७ लाख ९४ हजार ४०० रुपये जमा केले. मात्र, पैसे जमा झाल्यानंतर ना मोफत रेशन मिळाले, ना गृहउद्योगासाठी कच्चा माल. उलट संशयित महिलेने आपले कार्यालय बंद करून तेथून पलायन केले. त्यामुळे महिलांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
यासंदर्भात प्रथम खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून घेतला. त्यानंतर हद्दीच्या कारणास्तव सदर प्रकरण टिळकवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतला आहे.
रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून महिलांकडून मोठी रक्कम जमा करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta