






कुद्रेमानीत जीवन संघर्ष फौंडेशनतर्फे नवरत्नांचा भव्य सत्कार!
कुद्रेमानी : दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून जीवन संघर्ष फौंडेशन, बेळगाव यांच्या वतीने कुद्रेमानी येथील हनुमान मंदिरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवरत्नांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शिक्षण, साहित्य, वैद्यकीय, उद्योजकीय, क्रीडा आणि देशसेवा क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजीअण्णा कागणीकर यांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणाचे वाढते संकट आणि विषमुक्त आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून त्याचे गंभीर परिणाम बदलत्या हवामानाच्या स्वरूपात दिसून येत आहेत. निसर्गाच्या या बदलत्या स्वरूपाचा कोप ओढवून घेण्यापूर्वी मानवाने वेळीच सावध होणे आवश्यक आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे, विषमुक्त अन्नाचे उत्पादन व सेवन वाढविणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती आणि शुद्ध आहारातूनच सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते, असे विचार त्यांनी मांडले.
जीवन संघर्ष फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणपत पाटील यांनी आपल्या मनोगतात मातीशी असलेल्या नात्याचे महत्त्व विशद केले. माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला, कितीही उंचीवर पोहोचला, तरी त्याने आपल्या जन्मभूमीचा आणि मातीचा कधीही विसर पडू देऊ नये. माती ही केवळ आपल्या अस्तित्वाची ओळख नसून ती माणसामाणसांतील नाती दृढ करणारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी असते. आपल्या मातीत जन्म घेऊन विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या नवरत्नांचा सन्मान करताना मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सत्कार हा माणसाच्या कर्तृत्वाला नवी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा असतो. सन्मानामुळे व्यक्तीची समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करताना संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. गुणवत्ता, मेहनत आणि यश यांच्याबरोबरच उत्तम संस्कारांची जोड मिळाली, तरच व्यक्तिमत्त्वाला खरा आकार प्राप्त होतो, असे प्रतिपादन केले.
नवरत्नांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
या सोहळ्यात साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सीमाकवी रवींद्र पाटील, उद्योजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल बेळगाव क्रेडाईचे चेअरमन युवराज हुलजी, वैद्यकीय क्षेत्रात BHMS पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. स्नेहल शिवाजी पाटील व डॉ. अनुपमा शिवाजी पाटील, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कराटे प्रशिक्षक करुणा कल्लाप्पा पाटील, शैक्षणिक गुणवत्तेबद्दल पल्लवी चाळोबा सुतार (बारावी कला शाखा – ८०.३३ टक्के), साहिल रवळू पाटील (दहावी – ९३.२२ टक्के), सृष्टी संजय पाटील (सातवी – ९१.४३ टक्के) तसेच देशसेवेबद्दल निवृत्त सैनिक सुब्राव निंगाप्पा पाटील यांचा सन्मानचिन्ह, फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी केदारी नागोजी हुलजी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. गणपत पाटील व डॉ. शिवाजीअण्णा कागणीकर यांच्या हस्ते सर्व सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कुद्रेमानीचे अध्यक्ष विनायक पाटील होते. यावेळी धोंडिबा पाटील, सुरेश पाटील, दीपक पाटील, शंकर पाटील, पिंटू कागणकर, बाळाराम गंगाजी पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश यळळूरकर यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशराम काकतकर यांनी प्रभावीपणे केले, तर गोपाळ चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले.
गुणवंतांचा सन्मान, मातीशी नाळ आणि समाजाप्रती बांधिलकी या त्रिसूत्रीचा सुंदर संगम साधणारा हा दीपावली विशेष सत्कार सोहळा कुद्रेमानीकरांसाठी प्रेरणादायी ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta