






संघटन सृजन अभियानांतर्गत शिवस्मारक येथे कार्यक्रम; नव्या चेहऱ्याला संधी मिळणार की विद्यमान अध्यक्ष कायम राहणार, याकडे लक्ष
खानापूर : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्त सकाळी १०.३० वाजता खानापूर येथील शिवस्मारकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर संघटन सृजन अभियानांतर्गत जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून आता तालुकास्तरावर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तालुका अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी उद्याच्या कार्यक्रमात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
या प्रक्रियेसाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (केपीसीसी) वतीने निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, खानापूर तालुका काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार की विद्यमान अध्यक्षांनाच पुन्हा संधी दिली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी कोण इच्छुक आहेत आणि पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta