Sunday , November 22 2026
Breaking News

उपनगरातील मैदाने बनली मद्यपींचे अड्डे!; रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या ग्लासांमुळे अस्वच्छता

Spread the love

 

बेळगाव : शहराच्या उपनगरांमधील मोकळ्या जागा आणि मैदानांचा रात्रीच्या वेळी मद्यपानासाठी वापर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मद्यपान केल्यानंतर रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि अन्य कचरा तेथेच टाकून मद्यपी निघून जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शहराच्या विविध उपनगरांमध्ये अनेक मैदाने आणि मोकळ्या जागा आहेत. यापैकी काही जागांचा वापर लहान मुले खेळण्यासाठी, तर नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी करतात. मात्र, रात्रीच्या वेळी काही मद्यपी या ठिकाणी एकत्र येऊन मद्यपान करतात. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालण्याचे प्रकारही घडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यावर निर्बंध असतानाही हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येते.

सकाळी या मैदानांवर आणि मोकळ्या जागांमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि अन्य कचरा विखुरलेला दिसतो. त्यामुळे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना तसेच फिरायला येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक जागांचे रूपांतर मद्यपींच्या अड्ड्यांमध्ये होत असल्याने रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी उपनगरांमधील मैदाने आणि मोकळ्या जागांवर रात्रीची गस्त वाढवावी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या आणि परिसरात कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *