






काला घोडा येथील आर्ट एंट्रन्स गॅलरीत १६ नोव्हेंबरपर्यंत कलारसिकांना पर्वणी
बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार महेश होनुले यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील काला घोडा येथील ‘द आर्ट एंट्रन्स गॅलरी’ या प्रतिष्ठित कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल अवॉर्डप्राप्त क्रिएटिव्ह फिल्म दिग्दर्शक दीपक एस. व्ही. आणि जगप्रसिद्ध जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात महेश होनुले यांनी साकारलेल्या तीसहून अधिक चित्रांचा समावेश आहे. जलरंग आणि अॅक्रेलिक या माध्यमांतून त्यांनी ही चित्रे साकारली आहेत. कोकण, बेळगाव, नेपाळ, हम्पी, शिमला, गोवा आणि बदामी यांसारख्या विविध ठिकाणच्या निसर्गसौंदर्याचे, वास्तूंचे आणि परिसराचे चित्रण या कलाकृतींमधून करण्यात आले आहे.
विविध प्रदेशांतील निसर्गदृश्ये आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण वातावरण आपल्या कुंचल्यातून जिवंत करण्याचा प्रयत्न होनुले यांनी केला आहे. त्यांच्या चित्रांमधील रंगसंगती, सूक्ष्म निरीक्षण आणि कलात्मक मांडणी हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत सर्व कलारसिकांसाठी खुले राहणार असून, दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. बेळगावच्या चित्रकाराच्या कलाकृतींना मुंबईसारख्या महानगरातील प्रतिष्ठित कलादालनात स्थान मिळाल्याने बेळगावच्या कला क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta