


खानापूर : खानापूर तालुक्याचा मानबिंदू असलेल्या मराठा मंडळाच्या ‘म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालया’च्या विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा आपल्या अफाट खेळाच्या जोरावर जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव उंचावले आहे. नंदगड येथील प्रसिद्ध ‘तरुण क्रीडा मंडळ’ आयोजित 67 व्या भव्य व खुल्या कबड्डी स्पर्धेत महिला विभागात म मं ताराराणीच्या या शिलेदार मुलींनी तुफानी खेळ करत उपविजेतेपदावर दणदणीत मजल मारली !
अभ्यासासोबत मैदानी खेळासह कायमच अग्रक्रम दिसणाऱ्या या महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थिनींनी वैयक्तिक खेळांसोबतच सांघिक खेळातही आपला दरारा निर्माण केला आहे. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या विशेष प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे येथील खेळाडूंनी केवळ जिल्हा आणि राज्य स्तरावरच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही आपल्या विजयाच्या सोनेरी पाऊलखुणा उमटवल्या आहेत.
नंदगड येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण 10 नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. बेळगाव जिल्ह्यातील मातब्बर संघांना हुलकावणी देत दमदार खेळाचे प्रदर्शन करीत त म मं ताराराणीच्या मुलींनी आपल्या धडाकेबाज खेळाची चुणूक दाखवली.
म मं ताराराणी संघाचा पहिला सामना गदग-केळगेरी येथील बलाढ्य राष्ट्रीय संघाशी झाला. या रोमांचक सामन्यात ताराराणीच्या मुलींनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत गदग संघाला तब्बल दोन वेळा ऑलआउट केले आणि 27-7 अशा मोठ्या व ऐतिहासिक फरकाने दणदणीत विजय मिळवला.
पहिल्या उपांत्य फेरीत अतिशय चुरशीच्या सामन्यात संघाने बेळवट्टी संघावर 23-18 अशा फरकाने शानदार मात करत थेट अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात सांगलीच्या क्लबमध्ये खेळलेल्या तुल्यबळ संघासोबत झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या अंतिम सामन्यात म मं ताराराणीच्या संघाने झुंजार लढा दिला; मात्र अखेरीस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आकर्षक चषक आणि रोख 11000 रुपयांचे पारितोषिक आपल्या नावावर केले. या संपूर्ण स्पर्धेत ताराराणीच्या खेळाडूंनी आपली धारदार चमक दाखवली. विशेषत कुमारी पल्लवी पाटील (कुपटगिरी)हिने आपल्या जिगरबाज खेळाच्या जोरावर सामन्यात सर्वप्रथम ‘पकड’ करत, माजी जिल्हापंचायत सदस्य श्री. पुंडलिक कारलगेकर यांनी ठेवलेले ₹1100 रुपयांचे विशेष रोख पारितोषिक पटकावून महाविद्यालयाच्या मानत आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या यशामध्ये खालील प्रतिभावान खेळाडूंचे मोलाचे योगदान लाभले
दिव्य शिरोडकर (शिवठाण), पल्लवी पाटील (कुप्पटगिरी), रेणुका गुरव (गणेबैल), कार्तिकी लोकुळोचे (धामणे), धनश्री भोसले (लालवाडी)
या सर्व खेळाडूंनी आपल्या घामाचा प्रत्येक थेंबातून मराठा मंडळाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक आममंतात दुमदुमवला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन संचालक श्री. शिवाजीराव पाटील, श्री. परशराम गुरव, प्राचार्य अरविंद पाटील व मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव यांनी अभिनंदन केले असून मार्गदर्शक प्रशांत पांखरे, भीमसेन या अहोरात्र मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta