






सुवर्णसौध परिसरात ६०० सीसीटीव्ही कॅमेरे, १० ड्रोनद्वारे नजर; १५ नोव्हेंबरपासून दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी
बेळगाव : बेळगाव येथे २ ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने व्यापक सुरक्षा तयारी सुरू केली आहे. अधिवेशन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह आंदोलनांवर नियंत्रण आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, बेळगाव शहराबाहेरील राज्यातील विविध पोलीस घटक आणि जिल्ह्यांकडून अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. यामध्ये चार पोलीस अधीक्षक (आयपीएस), ११ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३५ डीएसपी/एसीपी, तसेच विविध दर्जाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५०० गृहरक्षक दलाचे जवान आणि ३५ केएसआरपी तुकड्यांचा समावेश आहे. याशिवाय एएससी, क्यूआरटी, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वानपथकाचीही मदत घेण्यात येणार आहे.
६०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि १० ड्रोनची नजर
अधिवेशन काळात सुरक्षेच्या दृष्टीने सध्याच्या सीसीटीव्ही व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणे, महत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालींचे मार्ग आणि सुवर्णसौध परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. तसेच सुवर्णसौध परिसरातील आंदोलने, शहरातील विविध मोर्चे आणि वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी १० ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र मोबाईल कमांड सेंटर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आंदोलनस्थळे आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सुमारे दोन हजार फिक्स बॅरिकेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. आंदोलनस्थळे, अधिकारी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या प्रवासमार्गावर २४ तास अग्निशमन आणि रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
पोलिसांसाठी स्वतंत्र टाऊनशिप
बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. सुवर्णसौधच्या मागील बाजूस शिंदोळी हद्दीत सुमारे ५०० पोलिसांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त भव्य तंबूंची टाऊनशिप उभारण्यात येत आहे. याशिवाय शहरातील विविध अतिथिगृहे, कल्याण मंडप आणि सरकारी इमारतींमध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.
सुमारे सात हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ नाश्ता, जेवण, गरम पाणी, वैद्यकीय पथक, अंथरूण-पांघरूण आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. निवासस्थाने आणि आंदोलनस्थळांसह सुमारे दहा ठिकाणी भोजनाची पाकिटे पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
३०० वाहनांची मागणी
अधिवेशनासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एस्कॉर्ट, पायलट आणि ताफा व्यवस्थापनाकरिता विविध पोलीस घटकांकडून सुमारे ३०० वाहनांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, क्रेन, पाण्याचे टँकर, ओपन ट्रक, बुलेटप्रूफ वाहने आणि जॅमर वाहनांचा समावेश आहे.
सुवर्णसौध परिसरात दोन किलोमीटरपर्यंत जमावबंदी
दरम्यान, सुवर्णसौधची सुरक्षा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण आणि अधिवेशन सुरळीत पार पडावे, यासाठी १५ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत सुवर्णसौध इमारतीपासून दोन किलोमीटरच्या परिघात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (पूर्वीचे सीआरपीसी कलम १४४) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असून, यंदा सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि वाहतूक व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta