






चिंचलीतील बोलेरो कॅम्परसह महाराष्ट्रातील स्प्लेंडर दुचाकी हस्तगत; २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : रायबाग तालुक्यातील चिंचली येथे चोरीला गेलेली बोलेरो कॅम्पर गाडी शोधून काढण्यात कुडची पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आंतरराज्य वाहन चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चिंचली येथील व्यापारी अरुण सिदलिंग कुंभार (वय ४६) यांनी आपल्या गोदामासमोर महिंद्रा कंपनीची बोलेरो कॅम्पर गाडी उभी केली होती. २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ या कालावधीत अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ४ हजार रुपये किमतीची ही गाडी चोरून नेली होती. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी कुडची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पानिव येथील सध्या वेळापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या सीताराम लक्ष्मण एडगे (वय ३६) याला अटक केली.
त्याच्याकडून चिंचली येथून चोरीला गेलेली बोलेरो कॅम्पर गाडी तसेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोडनिंब गावातून चोरीला गेलेली ८० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी, अथणीचे डीवायएसपी पी. वीरेंद्र कुमार आणि हारुगेरीचे सीपीआय रतनकुमार जिरग्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुडची पोलीस ठाण्याचे पीएसआय सुरेश मंटूर, पीएसआय पी. ए. माने आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta