






एक लाख रुपयांचे हमीपत्र आणि जामीनदाराच्या अटीवर न्यायालयाचा आदेश
बेळगाव : शेतातून जाणाऱ्या पायवाटेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ६६ वर्षीय संशयिताला तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. बासुदेव रुद्राप्पा पाटील (वय ६६, रा. होनकल, ता. खानापूर) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे.
या प्रकरणी नागू मादार यांनी खानापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी आणि संशयित यांची होनकल गावात शेजारी शेतजमीन आहे. शेतातून जाणाऱ्या पायवाटेवरून दोघांमध्ये वाद होता. २ जुलै २०२६ रोजी फिर्यादीची पत्नी शोभा आणि पाहुणी जानकू मादार या शेतातून जात असताना संशयिताने त्यांना पायवाटेवरून जाण्यास विरोध केला. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर जखमींना प्रथम खानापूर सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून खानापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३ जुलै रोजी संशयिताला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
बचाव पक्षाच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने एक लाख रुपयांचे हमीपत्र, तेवढ्याच रकमेचा जामीनदार, साक्षीदारांना धमकावू नये आणि पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशा अटी घालून जामीन मंजूर केला. बचाव पक्षातर्फे अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta