






व्हॉट्सॲप कॉलद्वारे विश्वास संपादन; खानापूर तालुक्यातील व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक
बेळगाव : शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल १४ लाख ६२ हजार ९८८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी खानापूर तालुक्यातील मल्लिकार्जुन नामक व्यक्तीने जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीने यापूर्वी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. यामध्ये त्यांना नफा तसेच तोटाही सहन करावा लागला होता. याचाच फायदा घेत जानेवारी २०२५ मध्ये एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सॲप कॉल केला. शेअर मार्केटमधील झालेला तोटा भरून देण्याचे आमिष दाखवत, आमच्याकडे एक लाख रुपये गुंतवल्यास महिन्याभरात तुमचे नुकसान भरून काढून देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे फिर्यादीने संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवला.
त्यानंतर संशयिताने दिलेल्या बँक खात्यांवर तसेच यूपीआय आयडीवर जानेवारी २०२५ ते मे २०२६ या कालावधीत फिर्यादीने टप्प्याटप्प्याने एकूण १५ लाख ६२ हजार ९८८ रुपये वर्ग केले. मात्र, या व्यवहारातून त्यांना केवळ एक लाख रुपये परत मिळाले. उर्वरित रक्कम आणि आश्वासन दिलेला नफा मिळाला नाही.
याबाबत संबंधित व्यक्तीशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. एकूण १५ लाख ६२ हजार ९८८ रुपये गुंतवून त्यापैकी एक लाख रुपये परत मिळाल्याने १४ लाख ६२ हजार ९८८ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta