Sunday , November 22 2026
Breaking News

गृहलक्ष्मीच्या तीन हप्त्यांची प्रतीक्षा कायम; खात्यात जमा झाले केवळ दोन हजार रुपये!

Spread the love

 

दिवाळीला सहा हजारांचा बोनस मिळणार असल्याच्या घोषणेने वाढल्या होत्या अपेक्षा; उर्वरित चार हजार रुपये कधी मिळणार, महिलांचा सवाल

बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर तीन महिन्यांचे सहा हजार रुपये एकाच वेळी जमा होणार असल्याची खुशखबर महिलांना देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये केवळ एका महिन्याचे दोन हजार रुपये जमा झाल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गृहलक्ष्मी योजनेचे तीन हप्ते एकाच वेळी जमा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना दिवाळीच्या खरेदीसाठी सहा हजार रुपयांचा बोनस मिळण्याची अपेक्षा होती. खात्यात रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना मात्र केवळ दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश मिळाल्याने निराशेला सामोरे जावे लागले.

कर्नाटक सरकारकडून गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागावा आणि महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील महिलांसाठी या योजनेची रक्कम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून योजनेचे हप्ते नियमितपणे जमा होत नसल्याच्या तक्रारी लाभार्थी महिलांकडून केल्या जात आहेत. तीन महिन्यांचे हप्ते प्रलंबित असल्याने दिवाळीला सहा हजार रुपये एकत्रित मिळतील, अशी आशा महिलांना होती. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही तीन महिन्यांची रक्कम एकत्रित जमा करण्याबाबत माहिती दिल्याने लाभार्थ्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या.

दिवाळीच्या सणासाठी सहा हजार रुपये मिळाल्यास खरेदीसह घरगुती खर्चाचे नियोजन करणे सोयीचे झाले असते. मात्र, प्रत्यक्षात केवळ एका महिन्याची रक्कम जमा झाल्याने उर्वरित चार हजार रुपये कधी मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

एकीकडे दिवाळीला महिलांना सहा हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याची चर्चा होती, तर दुसरीकडे खात्यात केवळ दोन हजार रुपये जमा झाल्याने महिलांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे प्रलंबित हप्ते तातडीने जमा करावेत, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *