






अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या २९ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे यंदा ३० वे वर्ष आहे. गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र अक्कलकोट येथून या पालखी परिक्रमेचा शुभारंभ होणार असून, तब्बल आठ महिने चालणारी ही परिक्रमा महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यांतील विविध गावांतून मार्गक्रमण करणार आहे.
बुधवार, दि. ७ जुलै २०२७ रोजी पालखी पुन्हा श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे दाखल होणार असल्याची माहिती पालखी परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष भोसले यांनी दिली.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या परिक्रमेचे आयोजन करण्यात येत आहे. पालखीचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, मुख्य पुरोहित प.पू. वे.शा.स. मोहनराव गोविंदराव पुजारी तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी प.पू. अण्णू महाराज पुजारी व धनंजय पुजारी यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन करून होणार आहे.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना घेता यावे, या उद्देशाने या पालखी परिक्रमेचे आयोजन केले जाते. वयोवृद्ध, महिला तसेच विविध कारणांमुळे अक्कलकोटला येणे शक्य नसलेल्या भाविकांच्या भेटीसाठी जणू श्री स्वामी समर्थच त्यांच्या गावात येत असल्याची भक्तिभावाची भावना या परिक्रमेच्या माध्यमातून जोपासली जात आहे.
ही पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन्मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांतून प्रवास करणार आहे. तसेच कर्नाटक व गोवा या शेजारील राज्यांतही परिक्रमा होणार आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून श्री स्वामी समर्थांच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि भक्तीचा सुगंध देशभर पसरला आहे. पालखीच्या माध्यमातून लाखो भाविकांना श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्याची आणि सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta