






टायर खराब झाल्याने शववाहिका गॅरेजमध्ये; दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय
बेळगाव : शहरात नागरी सुविधांची वानवा सातत्याने जाणवत असतानाच आता महापालिकेच्या मूलभूत सेवांचाही बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या चार शववाहिकांपैकी दोन शववाहिका टायर खराब झाल्यामुळे बंद अवस्थेत असून, सध्या केवळ दोनच वाहने सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेची आवश्यकता असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेची आवश्यकता भासते. अशावेळी अनेक नागरिक महापालिकेच्या शववाहिका सेवेचा आधार घेतात. मात्र, चारपैकी केवळ दोनच वाहने उपलब्ध असल्याने मागणीनुसार सेवा पुरविताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारा परिसर पाहता उपलब्ध शववाहिकांची संख्या अपुरी ठरत आहे.
महापालिकेच्या वाहनांच्या दुरुस्तीचा मुद्दा लेखा स्थायी समितीच्या बैठकीतही उपस्थित करण्यात आला होता. अनेक वाहने वेळेवर दुरुस्त केली जात नसल्याने ती महिनोनमहिने नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या होत्या. नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करून सेवेत दाखल करण्याच्या सूचनाही प्रशासनाला करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
सध्या दोन्ही नादुरुस्त शववाहिका टायर खराब झाल्यामुळे गॅरेजमध्ये उभ्या आहेत. नवीन टायर बसवून त्यांची दुरुस्ती करणे सहज शक्य असतानाही प्रशासनाकडून याबाबत तत्परता दाखविली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शहराची गरज लक्षात घेता महापालिकेकडे किमान पाच किंवा त्याहून अधिक शववाहिका असणे आवश्यक आहे. मात्र, उपलब्ध चारपैकी दोनच वाहने सुरू असल्याने नागरिकांना या सेवेचा पुरेसा लाभ मिळत नाही. किमान सध्याची नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करून सेवेत दाखल करावीत, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधांबाबत तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta