Sunday , November 22 2026
Breaking News

शंभराव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची नांदी रविवारी बेळगावात!

Spread the love

 

एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन

बेळगाव : ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2027 मध्ये पुणे येथे होणार आहे. या संमेलनाची नांदी म्हणून रविवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी येथील मराठा मंदिर येथे एक दिवसाचे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे वाङ्गय चर्चा मंडळ, आरपीडी महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

पुण्यात होणारे शंभरावे साहित्य संमेलन वैभवशाली रीतीने साजरे व्हावे या उद्देशाने पूर्वी जेथे जेथे साहित्य संमेलने झाली होती अशा सर्व ठिकाणी ही एक दिवसीय नांदी संमेलने घेण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची योजना आहे. बेळगावला यापूर्वी तीन वेळा साहित्य संमेलने भरविण्याचा मान मिळाला आहे. त्यानुसार आताही बेळगावची निवड अत्यंत योग्य ठरली आहे. त्यामुळे बेळगावातील समस्त मराठी भाषा प्रेमी मंडळीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

ज्येष्ठ संपादक आणि तरुण भारतचे मुख्य सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर हे या नांदी संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. उद्घाटक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा. योगेश सोमण हे उपस्थित राहणार आहेत. नाशिकचे विचारवंत डॉ. रमेश वरखेडे यांचे ‘मराठी भाषेसमोरील प्रश्न’ या विषयावर उद्बोधक व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये पुण्याचे शिक्षण तज्ञ आणि दूरदर्शी तंत्रज्ञ डॉ. भूषण केळकर यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.): संधी आणि आव्हाने’ या आजच्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विषयावरील दृकश्राव्य पद्धतीचे व्याख्यान हे या संमेलनाचे खास आकर्षण असेल.

दुपारच्या तिसऱ्या सत्रात ‘वेणूग्रामचा काव्यस्त्र’ या कार्यक्रमात बेळगावचे ज्येष्ठ कवी/कवयित्री इंदिरा संत, कृ. ब. निकुम्ह आणि शंकर रामाणी यांच्या अविट गोडीच्या कविता श्रीधर कुलकर्णी, संगीता बांदेकर आणि सहकलाकार सादर करणार आहेत. तसेच बेळगावपरिसरातील निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करतील. या सत्राचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध संशोधक कवयित्री डॉ. मंगला वरखेडे भूषविणार आहेत. चौथ्या सत्रात भाषाभिवृद्धीस प्रोत्साहित करणारा प्रातिनिधिक सन्मान कार्यक्रम होईल. त्यामध्ये बेळगाव परिसरातील कन्नड शाळेत मराठी विषय शिकविणाऱ्या तसेच मराठी शाळेत मराठी शिकवणाऱ्या काही शिक्षकांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर डॉक्टर किरण ठाकुर हे अध्यक्षीय समारोप करतील.

रविवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे हा एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळा होणार आहे. तरी बेळगाव आणि परिसरातील समस्त मराठी भाषा प्रेमीजनांनी बहुसंख्येने उपस्थित राहून हे संमेलन यशस्वी करावे असे आवाहन सर्व संयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *