Sunday , November 22 2026
Breaking News

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच बेळगावात थंडीचा कडाका

Spread the love

 

किमान तापमान १५ ते १७ अंशांवर, गरम कपड्यांच्या खरेदीला वेग

बेळगाव : ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’, असे म्हणण्याची वेळ आता बेळगावकरांवर आली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच शहरात थंडीचा जोर वाढला असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पहाटे आणि रात्रीच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत आहे. ‘गरिबांचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे.

शहरातील किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाने दडी दिल्याने निराश झालेल्या बेळगावकरांना आता अचानक वाढलेल्या थंडीने सुखद अनुभव दिला आहे. खऱ्या अर्थाने शहराला मिनी महाबळेश्वरचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे.

पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील विविध चौकांत आणि रस्त्यांच्या कडेला शेकोट्या पेटविल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर सकाळच्या वेळी गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यासाठी चहाच्या टपऱ्यांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. रात्री आणि पहाटे गारठा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. या बदलत्या वातावरणाचा अनुभव बेळगावकर घेत आहेत. विशेषतः उपनगरांमध्ये आणि शेतशिवारात पहाटेच्या वेळी हलके धुके पसरल्याचेही पाहायला मिळत आहे.

दरम्यान, थंडीची चाहूल लागताच गरम कपड्यांच्या खरेदीलाही वेग आला आहे. मागील आठवड्यापर्यंत गरम कपड्यांच्या दुकानांकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. खडेबाजार, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड आणि कडोलकर गल्ली परिसरातील दुकानांमध्ये स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे, शाली यांसह विविध उबदार कपड्यांची खरेदी केली जात आहे.

हवामानातील बदलामुळे किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, पहाटे आणि रात्रीचा गारठा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना आता थंडीच्या दिवसांत मिनी महाबळेश्वरचा अनुभव घेता येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *