







तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करीत वडिलांची राज्य पोलीस महासंचालकांकडे तक्रार; आर्थिक व्यवहारांसह पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : मारुतीनगर-सांबरा रोड येथील सर्वेश अभिजीत कंग्राळकर या तरुणाच्या खुनाला 20 नोव्हेंबर रोजी दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सर्वेशला भेटण्याच्या बहाण्याने मंडोळी रोडवर बोलावून घेणाऱ्या तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तपासाच्या संथगतीबरोबरच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त करीत सर्वेशचे वडील अभिजीत प्रभाकर कंग्राळकर यांनी थेट राज्य पोलीस महासंचालकांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास दक्ष आयपीएस अधिकाऱ्याकडे अथवा सीआयडीकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अभिजीत कंग्राळकर यांनी 3 नोव्हेंबर रोजी राज्य पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. या अर्जात त्यांनी खूनप्रकरणाच्या तपासाबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. बेळगाव परिसरात सुरू असलेला जुगार आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी यांचाही उल्लेख केला आहे. जुगार खेळताना झालेल्या वादातून शशी जालगार याच्यावर चाकू हल्ला झाला होता. त्याचाच सूड उगविण्यासाठी 20 सप्टेंबर 2026 रोजी आपल्या मुलाचा खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपींनी तपासाची दिशा भरकटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. एका हवालदारामार्फत हा आर्थिक व्यवहार ठरविण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच पोलिसांनी अद्याप महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तपास यंत्रणेच्या भूमिकेमुळे पोलिसांवरील आपला विश्वास उडाल्याचेही त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
सध्याच्या तपासाच्या पद्धतीवरून आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास वाटत नसल्याचे अभिजीत कंग्राळकर यांनी स्पष्ट केले आहे. या खूनप्रकरणातील प्रत्येक आरोपीला शिक्षा व्हावी, तसेच तपासात कथित आर्थिक व्यवहार करणारे अधिकारी आणि पोलिसांचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे सर्वेश खूनप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
——————————————————————-
तरुणीच्या माध्यमातून सर्वेशला बोलावल्याचा आरोप
इन्स्टाग्रामवर परिचय झालेल्या श्रेया जगदाळे (रा. गोकुळनगर, शिंदोळी) या तरुणीने सर्वेशला भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. गणपती पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून सर्वेश 20 सप्टेंबर रोजी घराबाहेर पडला होता. त्याला पहिल्या रेल्वे गेटजवळील लोटस हॉस्पिटल परिसरात येण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच शशी जालगार, राहुल जालगार, दशरथ रजपूत, अरुण हुल्लोळी, सचिन पागोजी, समर्थ पाटील आणि स्वयम पाटील हे तेथे दबा धरून बसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
श्रेया हिला पैशांचे आमिष दाखवून तिच्यामार्फत सर्वेशला घटनास्थळी बोलावून घेण्यात आल्याचा दावा वडिलांनी केला आहे. त्यानंतर सर्वेशचा खून करून मृतदेह मल्लप्रभा नदीवरील शंकर पेट पुलावरून नदीत टाकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta