Sunday , November 22 2026
Breaking News

केपीएससीच्या 319 राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांसाठी उद्या पूर्व परीक्षा

Spread the love

 

बेळगावातील 34 केंद्रांवर 12,244 उमेदवारांची परीक्षा; गैरप्रकार रोखण्यासाठी 250 पोलिसांचा बंदोबस्त

बेळगाव : कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे (केपीएससी) 319 राजपत्रित परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रविवार, 15 नोव्हेंबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.

राज्यभरातून या परीक्षेसाठी एक लाख 47 हजार 67 उमेदवारांनी नोंदणी केली असून, 15 जिल्ह्यांतील 345 परीक्षा उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 4 अशा दोन सत्रांत प्रत्येकी 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्याच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल सिग्नल जॅमर आणि कडक तपासणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. उमेदवारांसह अधिकृत कर्मचाऱ्यांचीही सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. पहिल्यांदाच प्रत्येक परीक्षा कक्षात दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यापैकी किमान एक पर्यवेक्षक सरकारी महाविद्यालयातील असेल. परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन वापरण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

खासगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचा इशाराही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. यंदा पाच पर्यायांची ओएमआर उत्तरपत्रिका अनिवार्य करण्यात आली असून, सर्व 2 लाख 94 हजार 134 उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती परीक्षेच्या दिवशी केपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दरम्यान, बेळगाव शहरातील 34 परीक्षा केंद्रांवर 12 हजार 244 उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडावी तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी शहरात सुमारे 250 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *