






बेळगाव : फिटनेसप्रेमी, धावपटू आणि क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, येत्या रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगावात ‘हिंदाल्को नम्मा बेळगाव मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. एलिट मास्टर्स रनिंग टीम, बेळगाव यांच्या वतीने आयोजित या मॅरेथॉनमध्ये देशभरातून सुमारे एक हजार धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेसाठी एकूण ३ लाख रुपयांची रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
येळूर येथील केएलईच्या मागील बाजूस असलेल्या सीआर स्पोर्ट्स अरेना येथून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. येळूर -सुळगा-राजहंसगड-यरमाळ या निसर्गरम्य मार्गावरून ही मॅरेथॉन पार पडणार आहे.
‘रन टू सेव्ह नेचर’ संकल्पना
‘रन टू सेव्ह नेचर’ अर्थात निसर्ग वाचवण्यासाठी धावा, या संकल्पनेवर आधारित या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि नागरिकांमध्ये आरोग्य व व्यायामाबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाला हिंडाल्कोचे मुख्य प्रायोजकत्व असून, ग्रीन सेव्हियर्स ही स्वयंसेवी संस्था सहयोगी भागीदार आहे.
पाच गटांत स्पर्धा
या मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर धावणे, ५ किलोमीटर धावणे आणि ३ किलोमीटर फन रन/वॉक अशा पाच प्रकारांचा समावेश आहे. विविध वयोगटांतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सहभागींसाठी विशेष सुविधा
नोंदणी केलेल्या वेळ नोंदविल्या जाणाऱ्या स्पर्धांतील धावपटूंना अधिकृत टाइमिंग चिप, स्पर्धेचे टी-शर्ट, फिनिशर मेडल, डिजिटल प्रमाणपत्र, मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत, स्पर्धेतील छायाचित्रे आणि स्पर्धेनंतर नाश्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ऑनलाइन नोंदणी सुरू
मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांनी www.runadda.com किंवा www.alpharacingsolution.com या संकेतस्थळांवर नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी ८२८३८७५१५० किंवा ९८४४१२६९१८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
Belgaum Varta Belgaum Varta