






बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बेनकनहळ्ळी येथील घरकुल वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांसोबत आनंदाचे क्षण घालविले. गाणी, अभंग, भावगीते, कविता आणि नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वृद्धाश्रमातील वातावरण आनंदमय झाले.
सोसायटीच्या महिला व पुरुष अशा सुमारे २६ सभासदांनी या उपक्रमात सहभाग घेतला. हिंदी, मराठी आणि कन्नड चित्रपटगीतांसह अभंग, भावगीते व कविता सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. विशेष म्हणजे, वयाच्या ८१व्या वर्षीही वनिता जोशी यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. वृद्धाश्रमातील आजींनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या करमणूक कार्यक्रमात विश्वास धुराजी, भारती गावडे, चंद्रशेखर गायकवाड, रवींद्र हंपीहोळ्ळी, भरत गावडे, सुरेंद्र व योगिनी देसाई, रवींद्रनाथ व स्नेहलता जुवळी, स्वाती माने, उदय देशपांडे, पुंडलिक दळवी, विजयमाला पाटील, अश्विनी पाटील, शशिकांत शिंदे, कृष्णा इंदूलकर, प्रकाश कुडतरकर, शुभांगी गिडे, विजय वाईगडे, अनंत सावंत, अरविंद मुतगेकर, सुरेश प्रभू खानोलकर, पी. एन. रायबागी आणि औदुंबर शेट्ये यांनी सहभाग घेतला.
यावेळी सिद्धाप्पा व सुनित्रा देसाई या दाम्पत्याने वैवाहिक जीवनाची ५५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल विठ्ठल व चारुलता भावे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच घरकुल वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका संध्या वेदक यांच्या सेवाभावी कार्याबद्दल सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संध्या वेदक यांनी वृद्धाश्रमातील विविध अनुभव कथन केले.
कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, खजिनदार विनिता बांडगी आणि सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta