






बेळगाव : शास्त्रीनगर परिसरातील किराणा मालाचे दुकान पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रकार रविवारी घडला. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विनायक वेर्णेकर याच्याविरोधात खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नीता सतीश पाटील (वय ४८, रा. नेसरकर प्लाझा, आठल्ये चाळ, शास्त्रीनगर) या राजेंद्र किराणा स्टोअर चालवितात. गीता केशव कणबरकर यांच्या इमारतीमध्ये हे दुकान आहे. रविवारी दुपारी संशयित विनायक वेर्णेकर हा दुचाकीवरून दुकानाजवळ आला. जुन्या रागातून त्याने पेट्रोल टाकून दुकानाला आग लावल्याची तक्रार नीता पाटील यांनी दिली आहे.
या आगीत दुकानातील विविध साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर फिर्यादीचा जबाब नोंदवून संशयित विनायक वेर्णेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta