Sunday , November 22 2026
Breaking News

माशांच्या ट्रेखाली गोव्याच्या दारूची वाहतूक; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

बेळगाव : मासे आणि बर्फाच्या ट्रेखाली गोव्याच्या दारूची वाहतूक करण्याचा प्रकार उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. बाची रोडवरील वैभव हॉटेलजवळ करण्यात आलेल्या कारवाईत ३५ लाख २८ हजार रुपये किमतीची दारू आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ५५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान वाहनचालक पसार झाला.

उडुपी येथे नोंदणी असलेल्या ‘ओशन फिशर’ या कोल्ड स्टोरेज वाहनातून मासे आणि बर्फाच्या वाहतुकीच्या आडून गोव्याची दारू मंगळुरू येथे नेली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्या पथकाने बाची रोडवर संशयित वाहन अडवून तपासणी केली. मात्र, पथकाची चाहूल लागताच चालक वाहन सोडून पळून गेला.

वाहनातील माशांचे ट्रे बाजूला करून तपासणी केली असता, त्याखाली दारूचे बॉक्स लपविल्याचे आढळले. ‘माल्ट व्हिस्की’ असे नमूद असलेल्या ३५० पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये १८० मिलीच्या ‘बिग बॉस’ ब्रँडीच्या बाटल्या होत्या. जप्त केलेल्या दारूची किंमत ३५ लाख २८ हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याची माहिती अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी दिली.

दारूच्या बाटल्यांवरून तस्करीच्या मूळ ठिकाणाचा अचूक पत्ता मिळू शकलेला नाही. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि अवैध वाहतूक करणाऱ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या सीमावर्ती भागात तपासणी अधिक कडक करण्यात येणार असून, नवीन तपासणी नाके उभारण्याचे नियोजन असल्याचे डॉ. मंजुनाथ यांनी सांगितले. बेकायदेशीररीत्या राज्याबाहेरून आणलेल्या मद्याची गुणवत्ता तपासलेली नसल्याने नागरिकांनी अशा मद्याच्या सेवनापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *