






बेळगाव : कर्नाटक स्टेट इंडस्ट्रियल आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यातील ज्येष्ठ दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांचा विश्वभारत सेवा समिती आणि पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालय, शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते मल्लेश चौगुले यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. तसेच, पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातील कुस्तीपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मल्लेश चौगुले यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय निवड झालेले कुस्तीपटू 19 नोव्हेंबरला धारवाड येथे स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाला मल्लेश चौगुले आणि कोमल सोमेश देवगेकर (जर्मनी) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना ४० ट्रॅक जॅकेट भेट देण्यात आले. यानंतर मल्लेश चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रकाश नंदिहळी यांनीही मनोगत व्यक्त करत चौगुले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पी. ओ. धामणेकर, सुब्रमण्यम कांबळे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर नागेनहट्टी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta