






महाराष्ट्राच्या धर्तीवर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार; स्नेहमेळाव्यात आश्वासन
बेळगाव : मंडप आणि इलेक्ट्रिकल डेकोरेशन हा रोजगारनिर्मिती करणारा महत्त्वाचा व्यवसाय असून, या क्षेत्रातील व्यावसायिक आणि कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी लवकरच संबंधित विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
खासबाग येथील धारवाड रोडवरील साई भवन येथे सोमवारी बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव मन्नोळकर होते.
मंत्री जारकीहोळी म्हणाले, मंडप आणि इलेक्ट्रिकल डेकोरेशन व्यवसायातील मालक तसेच कामगार हे असंघटित क्षेत्रात येतात. त्यामुळे त्यांना विविध शासकीय सुविधा आणि योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. महाराष्ट्राच्या धर्तीवर बेळगावमधील या व्यावसायिकांनाही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील.
खासदार जगदीश शेट्टर यांनी या व्यवसायातून लाखो लोकांना रोजगार मिळत असल्याचे सांगितले. मात्र, असंघटित क्षेत्रातील या व्यावसायिकांना अद्याप पुरेशा शासकीय सुविधा मिळालेल्या नाहीत. संघटनेने एकत्रितपणे आपल्या समस्या मांडाव्यात. त्या सोडविण्यासाठी आपणही सरकारदरबारी पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्हा पेंडाल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरभाई चव्हाण यांनी महाराष्ट्रातील मंडप व्यावसायिकांच्या संघटनात्मक कार्याची माहिती दिली. सुमारे ४० वर्षांपूर्वी कोल्हापुरात मंडप व्यावसायिकांची पहिली संघटना स्थापन झाली. आज या संघटनेचे ८६ हजार सदस्य असून, दीड कोटी रुपयांचा निधी जमा आहे. संघटनेच्या एकजुटीमुळे महाराष्ट्र शासनाकडून मंडप व्यावसायिकांना विविध सुविधा मिळवून देण्यात यश आले आहे. गोडाऊनसाठी एमआयडीसीमध्ये जागा तसेच ५० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नारायण चौगुले, उपाध्यक्ष भाऊसाहेब मन्नोळकर, दामोदर रतन, सचिव परशुराम साळुंखे आदी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेशपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नारायण चौगुले यांनी स्वागत करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. महादेव मन्नोळकर यांनी आभार मानले. अनिल अंबरोळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta