






खासदार जगदीश शेट्टर यांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी बँकांनी दबाव आणू नये. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना कर्जफेडीसाठी पुरेसा अवधी द्यावा. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिल्याचे आढळल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा खासदार जगदीश शेट्टर यांनी दिला.
जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी (१६ नोव्हेंबर) आयोजित २०२६-२७ सालच्या तृतीय त्रैमासिक जिल्हा सल्लागार समिती (डीसीसी) आणि जिल्हास्तरीय समीक्षा समितीच्या (डीएलआरसी) बैठकीत ते बोलत होते.
संकटग्रस्त शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावणे किंवा तातडीने वसुलीचा आग्रह धरणे योग्य नाही. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जफेड करण्याची संधी द्यावी. आगामी हंगामातील शेतीकामांसाठी नवीन पीककर्ज मंजूर करतानाही बँकांनी सहकार्य करावे, असे निर्देश शेट्टर यांनी दिले.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना बँकांनी विलंब न करता कर्जसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना कर्ज देताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची असून, पात्र लाभार्थ्यांना विनाकारण अडवणूक करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वेक्षण करावे. आवश्यक त्या ठिकाणी नवीन बँक शाखा सुरू करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच बँकांमध्ये कन्नड भाषेच्या वापराला प्राधान्य देऊन ग्राहकांशी स्थानिक भाषेत संवाद साधण्याची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
अर्ज फेटाळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनीही बँक अधिकाऱ्यांना सूचना देताना, सरकारी योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज अर्ज विनाकारण नाकारू नयेत किंवा मंजुरीसाठी विलंब करू नये, असे सांगितले. अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बँकांमध्ये ग्राहकांना भाषेच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. कर्मचाऱ्यांनी कन्नड भाषेत संवाद साधण्यास प्राधान्य द्यावे आणि ग्राहकांना सुलभ बँकिंग सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वित्तीय योजना सॅच्युरेशन अभियान आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचारपत्रकांचे प्रकाशन खासदार जगदीश शेट्टर व जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीला लीड बँक व्यवस्थापक प्रशांत घोडके, कॅनरा बँकेचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक जे. परमेश्वरन, विविध बँकांचे अधिकारी, जिल्हास्तरीय विभागांचे अधिकारी तसेच एनआरएलएम बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta