Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगावमध्ये २७ ते २९ डिसेंबरदरम्यान सहावे राज्यस्तरीय विज्ञान संमेलन

Spread the love

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष नियोजन करा : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने बेळगावमध्ये २७ ते २९ डिसेंबरदरम्यान सहावे राज्यस्तरीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक तयारी करावी, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. शहरातील सी.पी.एड. मैदानावर हे संमेलन होणार आहे.

बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील सरकारी व खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे, यासाठी विशेष नियोजन करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बसव्यवस्था करावी. खासगी शाळांनी आपल्या वाहनांतून विद्यार्थ्यांना आणावे. शहरातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचाही सहभाग निश्चित करावा, असे निर्देश जारकीहोळी यांनी दिले.

संमेलनस्थळी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सरकारी विभागांच्या स्टॉल्सबरोबरच वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या खासगी संस्थांनाही स्टॉल्स उभारण्याची संधी द्यावी. राज्य विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधून तयारी पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संमेलनासाठी विविध समित्या स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. ३० नोव्हेंबरपर्यंत संमेलनाच्या आयोजनाची संपूर्ण रूपरेषा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. संमेलनासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच कार्यक्रमस्थळी वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हुलीकल नटराज यांनी संमेलनामागील उद्देश स्पष्ट केला. २०२१ पासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच विज्ञान संमेलने यशस्वीरीत्या पार पडली असून, सहावे संमेलन बेळगावमध्ये होत आहे. ज्येष्ठ वकील प्रा. रविवर्मा हे संमेलनाचे सभाध्यक्ष असणार आहेत.

संमेलनात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक प्रदर्शनांचे स्टॉल्स, फिरते तारांगण आणि विज्ञानविषयक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. २७ डिसेंबर रोजी संमेलनाच्या सभाध्यक्षांची मिरवणुकीद्वारे स्वागतयात्रा काढण्यात येणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीला आमदार आसिफ (राजू) सेठ, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत योजना संचालक रवी बंगारप्पनवर, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *