






दहा महिन्यांपूर्वी हरवलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे बँक खात्यावर डल्ला; सायबर चोरट्यांचा प्रताप
बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. आता बंद न केलेल्या आणि हरवलेल्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी एका वृद्ध दांपत्याला तब्बल 4 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. अथणी तालुक्यातील संक्रट्टी येथे हा प्रकार घडला असून, जिल्हा सायबर क्राईम विभागात याची नोंद झाली आहे.
संक्रट्टी येथील 68 वर्षीय ब्रह्मासुरी या वृद्ध शेतकऱ्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ब्रह्मासुरी आणि त्यांच्या पत्नी विमला यांच्या नावे हारुगिरी येथील आरबीएल बँकेत संयुक्त खाते आहे. या खात्याला त्यांचा मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला होता. मात्र, सुमारे दहा ते अकरा महिन्यांपूर्वी बँक खात्याशी जोडलेले सिमकार्ड हरविले होते.
सिमकार्ड हरवल्यानंतर दांपत्याने नवीन मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड घेतले; मात्र बँक खात्याशी जोडलेला जुना मोबाईल क्रमांक बदलला नाही. तसेच हरवलेले सिमकार्डही बंद केले नाही. याचाच गैरफायदा घेत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 या कालावधीत संबंधित बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने 4 लाख 90 हजार रुपये लंपास केले.
याप्रकरणी जिल्हा सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.
हरवलेल्या सिमकार्डकडे दुर्लक्ष नको
मोबाईल हरवल्यानंतर केवळ नवीन सिमकार्ड घेऊन थांबणे धोकादायक ठरू शकते, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. हरवलेले सिमकार्ड तातडीने बंद करणे आणि बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा जुन्या क्रमांकाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार बँक खात्यांवर डल्ला मारू शकतात. त्यामुळे नागरिकांनी मोबाईल आणि बँक खात्याच्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta