Sunday , November 22 2026
Breaking News

…अखेर निपाणीतील अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा

Spread the love

 

व्यवसायिकांची धावपळ ; बस स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले होते. शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच व्यापारी संकुलांच्या परिसरात अतिक्रमणांचा विळखा पडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याची गंभीर दखल घेत नगरपालिका प्रशासनाने मंगळवारी (ता. १७) सायंकाळी बसस्थानक परिसरातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. या कारवाईमुळे अनेक रस्ते मोकळे झाल्याने वाहनधारक आणि नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेपूर्वी नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन करत दोन दिवस जनजागृती केली होती. त्यानुसार काही किरकोळ व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली होती. त्यानंतर मंगळवारी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी अभियंते विवेक जोशी, शरद सावंत, विनायक जाधव, संपत कुरणे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी बसस्थानक परिसर, चिक्कोडी रोड, कित्तूर चन्नम्मा चौक, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, जुना रणजीत स्टोअर्स ते नगरपालिका या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला मांडलेले विविध साहित्य हटविण्यात आल्याने या परिसरातील रस्ते मोकळे झाले आहेत.

शहरातील अनेक प्रमुख चौक, व्यापारी संकुले तसेच रुग्णालयांच्या परिसरातही अतिक्रमणांची समस्या गंभीर बनली होती. यापूर्वी नगरपालिका बैठकीत अतिक्रमण हटावचा विषय चर्चेला आला होता. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा अतिक्रमणांमध्ये वाढ झाली होती. आता सुरू झालेली मोहीम केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न ठेवता सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

चार दिवसांत अतिक्रमणे हटविणार

मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला आहे. मुख्य रस्ते, चौक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या मार्गांवरील अतिक्रमणे चार दिवसांत हटविण्यात येणार आहेत. यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी दिला.

रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली होती. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत होते. आता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

मुलांना मैदानावर पाठवून खिलाडूवृत्ती जोपासा

Spread the love        प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी; बोरगावमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *