Sunday , November 22 2026
Breaking News

यल्लम्मा देवीला सर्पदोष झाल्याची अफवा; तीन हजारांहून अधिक महिला भीमा नदीत दाखल!

Spread the love

 

सौन्दत्ती देवस्थान प्रशासनाकडून अफवा फेटाळली

बेळगाव/यादगीर : सौन्दत्ती येथील श्री यल्लम्मा देवीला सर्पदोष झाल्याची अफवा पसरल्याने सुमारे तीन हजारांहून अधिक महिला भाविकांनी यादगीरजवळील भीमा नदीच्या काठावर गर्दी केल्याची घटना मंगळवारी घडली. कोणताही अधिकृत धार्मिक कार्यक्रम किंवा यात्रा नसताना केवळ तोंडी पसरलेल्या अफवेवर विश्वास ठेवून महिलांनी नदीत स्नान करून विविध धार्मिक विधी केले.

यल्लम्मा देवीच्या पादुकांना सापाने गिळले असून सर्पदोष निवारणासाठी महिलांनी नदीत पवित्र स्नान करून नवीन तांब्याच्या पादुका धारण कराव्यात, अशी अफवा पसरली होती. या अफवेवर विश्वास ठेवून विविध गावांतील मातंगी समाजातील महिला बस आणि खासगी वाहनांनी यादगीर येथे दाखल झाल्या. काही महिला दूरच्या गावांतूनही आल्या होत्या.

महिलांनी भीमा नदीत स्नान करून जुनी वस्त्रे नदीकाठी सोडली आणि नवीन साड्या परिधान केल्या. त्यानंतर नदीकाठावर दिवे लावून, फुले, फळे अर्पण करून यल्लम्मा देवीची पूजा केली. नवीन पादुकांची पूजा करून त्या धारण करण्याचा विधीही करण्यात आला. यावेळी यल्लम्मा देवीची भक्तिगीते गात महिलांनी श्रद्धा व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकारामुळे नदीचे पाणी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाल्याचेही समोर आले आहे.

देवस्थान प्रशासनाकडून अफवा फेटाळली

सौन्दत्ती यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाच्या सचिव राजश्री जैनापूरे यांनी या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. यल्लम्मा देवीला कोणताही सर्पदोष झालेला नसून ही पूर्णपणे निराधार अफवा आहे. भाविकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि श्रद्धेने सौन्दत्ती देवस्थानात दर्शनासाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले.

देवस्थानचे पुजारी राजू पाटील यांनीही यल्लम्मा देवीला सर्पदोष झाल्याची बाब अशक्य असल्याचे सांगत अशा प्रकारचे विधी करू नयेत, असे आवाहन केले आहे.

केवळ अफवेमुळे हजारो महिला नदीकाठी जमा झाल्याच्या या घटनेने परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *