






गर्लगुंजी (प्रतिनिधी) : दिनांक १४ नोव्हेंबर रोजी गर्लगुंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या अटीतटीच्या भव्य कबड्डी स्पर्धेत मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने “कितूर, नंदगड, रामदुर्ग”, येथील विजया सोबतच आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर गर्लगुंजी येथेही उपविजेतेपद पटकावत उपस्थितांची मने जिंकली शिवाय रूपये 8500 रोख बक्षिसासह आकर्षक चषकही ताराराणी महाविद्यालयाच्या नावावर केला.
गर्लगुंजी याथील थरारक महासंग्रामात आपल्या अफाट ऊर्जा, जिद्द आणि कौशल्याने महाविद्यालयाच्या तरुण शिलेदारांनी मैदान गाजवल्यामुळे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी अभिनंदन केले आहे.
उपांतपूर्व सामन्यात नंदिहळ्ळी व उपांत्य सामन्यात सांगली संघाबरोबर खेळतांना ताराराणीच्या रेडर्सनी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टात अक्षरशः धडक दिली. कॅप्टन दिव्या शिरोडकर हिने आपल्या हुशारीने आणि वेगवान फुर्तीने एकाहून एक यशस्वी रेड (Raids) करत पॉईंट्स वसूल केले. तिच्या भेदक चढाईसमोर समोरच्या संघाचा बचाव कोलमडला, ज्यामुळेच तिला ‘उत्कृष्ट चढाईपटू’ (Best Raider) या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी हा सत्कार मराठा मंडळाचे संचालक शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तर या प्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव सर कौतुक सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिले होते.
दिव्याला उत्तम साथ दिली ती रेणुका गुरव हिने; तिने आपल्या चाणाक्ष आणि पॉवरफुल रेड्सच्या बळावर सतत बोनस पॉईंट्स आणि टच पॉईंट्स घेत संघाची धावसंख्या भक्कम केली. केवळ चढाईतच नव्हे, तर बचावातही (Defense) म मं ताराराणीच्या मुलींनी लोखंडी भिंत उभी केली. पल्लवी पाटील हिने उत्कृष्ट अँटी-रेड आणि जबरदस्त चेन टॅकल करत प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य रेडर्सना आपल्याच कोर्टात रोखून धरले. तिच्या अचूक टाईमिंग आणि ताकदीच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या डिफेंन्सिव्ह पॉईंट्स घेत संघाने सामन्यावर पकड मजबूत ठेवली.
या धडाकेबाज संघात दिव्या शिरोडकर (शिवठाण), पल्लवी पाटील (कुप्पटगिरी) आणि रेणुका गुरव (गणेबैल) यांच्यासह सृष्टी हंगिरकर (यडोगा), धनश्री भोसले (लालवाडी), श्रावणी पाटील (कुप्पटगिरी), कार्तिकी लोकलुचे (धामणे), लक्ष्मी गोरल (माडी-गुंजी) आणि आरती तोरगल (चापगाव) या सर्वच खेळाडूंनी शेवटच्या श्वासापर्यंत अटीतटीचा खेळ करत सांघिक एकजुटीचे अप्रतिम दर्शन घडवले.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांचे सततचे प्रोत्साहन, कबड्डी कोच प्रशांत पांखरे, तसेच भीमसेन व भरमाजी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्राचार्य अरविंद पाटील व सर्व प्राध्यापकांच्या प्रेरणेमुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला असून, यात समस्त पालक वर्गाचेही मोलाचे सहकार्य लाभले. या देदीप्यमान यशाबद्दल सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून, ताराराणी महाविद्यालयाच्या क्रीडा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta