






‘जो समाज परिपक्व असतो, त्याला विनोद कळतो. ग्रंथ हे समाजाचे सुख असते’ – डॉ. रमेश वरखेडे
बेळगाव : लोकमान्य ग्रंथालयातर्फे यंदापासून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना साहित्य पुरस्कार देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच वर्षी बेळगाव आणि परिसरातील चार साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. शोभा नाईक, प्रा. डॉ. द. तु. पाटील आणि पूजा भडांगे यांना सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
टिळकवाडी येथील लोकमान्य ग्रंथालय-वरेरकर नाट्य संघ सभागृहात आयोजित कार्यक्रमात नाशिकचे ज्येष्ठ विचारवंत, संपादक आणि लेखक डॉ. रमेश वरखेडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुस्तक आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. मंगला वरखेडे उपस्थित होत्या.
मुख्य भाषणात डॉ. रमेश वरखेडे यांनी लोकमान्य ग्रंथालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल रंजना कारेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले. ज्ञानप्रवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रंथपालाची भूमिका कॅटॅलिस्टसारखी महत्त्वाची असते, असे सांगून त्यांनी साहित्याचे विविध प्रकार, समीक्षा, कथा, कविता आणि लोककथा यांविषयी मार्गदर्शन केले. समाजाचे आरोग्य टिकवण्यासाठी विनोद महत्त्वाचा असून, परिपक्व समाजालाच विनोदाचे महत्त्व समजते, असेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक मुलामध्ये प्रतिभा असते, तिला योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना चारही सन्मानित साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यळ्ळूर साहित्य संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक कै. अनंत मनोहर, लोकमान्य ग्रंथालय, विविध वाचनालये, प्रकाशक आणि वाचक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कर्मभूमीत मिळालेला हा पुरस्कार विशेष आनंद देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारामुळे प्रगल्भता, जबाबदारीची जाणीव आणि पुढील साहित्यनिर्मितीसाठी नवे प्रोत्साहन मिळते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावंतवाडीच्या कवयित्री शरयू आसोलकर यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी डॉ. रमेश वरखेडे यांचे, तर ग्रंथपाल रंजना कारेकर यांनी डॉ. मंगला वरखेडे यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.
सन्मानित साहित्यिकांचा परिचय माधव कुंटे आणि अनुजा पाटील यांनी करून दिला. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी केले. माधव कुंटे यांनी आभार मानले.
यावेळी मराठी विद्या निकेतन आणि वि. गो. साठे प्रबोधिनी यांच्या वतीनेही चारही साहित्यिकांचा पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे अर्थसाहाय्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta