Sunday , November 22 2026
Breaking News

‘ज्वाला’च्या ५२ व्या दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

Spread the love

 

 

कै. कृष्णा मुचंडी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुढील वर्षापासून उत्कृष्ट पत्रकार व साहित्यिक पुरस्कार

बेळगाव : नाथ पै सर्कल, खासबाग येथील नेताजी सुभाषचंद्र सांस्कृतिक भवनात मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) बेळगाव वार्ताच्या ‘ज्वाला’ या ५२ व्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील मराठी भाषाप्रेमी, वाचक आणि जाहिरातदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढविली. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, वाचन संस्कृतीचे संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने दिवाळी अंकांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, भाजप नेते किरण जाधव, समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, बेळगाव वार्ता पोर्टलचे संपादक सुहास हुद्दार, ‘ज्वाला’चे संस्थापक कै. कृष्णा मुचंडी यांच्या पत्नी विमल मुचंडी आणि अक्षय सार्वमतचे संपादक विलास बेळगावकर यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी भाजप नेते किरण जाधव, आबासाहेब दळवी आणि शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करत ‘ज्वाला’च्या ५२ वर्षांच्या साहित्यिक आणि पत्रकारितेतील वाटचालीचे कौतुक केले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना बहुजन समाजातील मुलांनी अनावश्यक समारंभांमध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये शिस्तबद्ध जीवनशैली रुजवावी. मुलांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होण्याबरोबरच वाचनाची आवड वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजच्या काळात दिवाळी अंक हे वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि नव्या पिढीला साहित्याकडे आकर्षित करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, बेळगाव वार्तातर्फे यावेळी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ‘ज्वाला’चे संस्थापक कै. कृष्णा मुचंडी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुढील वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकाराला ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’, तर साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या साहित्यिकाला ‘उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘ज्वाला’च्या ५३ व्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या मुहूर्तावर या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे बेळगाव वार्तातर्फे जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगाव वार्ता परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. एम. गोरल यांनी केले, तर विलास बेळगावकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *