






गुंडविरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला
बेळगाव : वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत म. निंबाळकर यांची बेंगळुरू शहर वाहतूक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गुंडविरोधी पथकाच्या (अँटी-रौडी स्क्वॉड) पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारने बुधवारी (१८ नोव्हेंबर) वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. या प्रशासकीय फेरबदलांत हेमंत निंबाळकर यांच्यावर बेंगळुरू शहरातील वाहतूक व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही ते पार पाडणार आहेत.
हेमंत निंबाळकर यांनी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळामुळे बेळगावशी त्यांचे विशेष नाते असून, त्यांच्या नव्या नियुक्तीची बातमी बेळगावमध्येही चर्चेचा विषय ठरली आहे.
बेंगळुरू शहरातील पोलीस प्रशासनात झालेल्या महत्त्वपूर्ण फेरबदलांतून त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या दुहेरी जबाबदारीमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह गुन्हे नियंत्रणाच्या कामालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेमंत निंबाळकर यांच्या नव्या नियुक्तीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta