






कावळेवाडी : पुस्तक वाचनाची अभिरुची निर्माण करण्यासाठी, नेहमी वाचन करा. आपली मातृभाषा टिकून ठेवण्यासाठी सातत्याने ग्रंथ वाचन करणं आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगा. जीवनात समस्यांना सामोरे जाण्यासाठी पुस्तके आपले मार्गदर्शक ठरतात. वाचनातून आत्मविश्वास दृढ होत जातो.मराठीचा विकास, संवर्धनासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था नेहमीच अग्रेसर आहे, असे मौलिक विचार वाय. पी. नाईक यांनी बिजगर्णी हायस्कूलमध्ये व्यक्त केले.
पश्चिम विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरूवर्य एस. आर. मोरे यांनी महात्मा गांधी संस्थेला तीनशे पुस्तके भेट दिली होती.
ही पुस्तके ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे या हेतूने पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जे विद्यार्थी अधिकाधिक पुस्तके वाचतील त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कर्ले, बेळवट्टी, कावळेवाडी, बिजगर्णी शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात ही पुस्तके वितरित केली आहेत. उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर इतर शाळांतूनही पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत असे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी सांगितले.
या मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेचे पदाधिकारी अॅड नामदेव मोरे, सतीश जाधव, पी. आर. गावडे, शिवाजी शिंदे, के. आर. भास्कर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta