






इंधनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी; अहवालाकडे प्रशासनाचे लक्ष
बेळगाव : पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळले जात असल्याच्या तक्रारी आता बेळगावमध्येही समोर आल्या आहेत. शहरातील तीन पेट्रोल पंपांविरोधात अनामिक तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचे नमुने संकलित करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याच्या तक्रारी विविध स्तरांतून प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरूनही या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बेळगाव शहरातील तीन पेट्रोल पंपांविरोधात अनामिक तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत संबंधित पंपांवरील इंधनाचे नमुने काळजीपूर्वक गोळा केले. हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अहवालातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना इंधनाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून पुरवठा होणाऱ्या इंधनाची निर्धारित गुणवत्ता आणि मानके कायम राखणे बंधनकारक आहे. इंधनाच्या गुणवत्तेत कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपाविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta