






बंगळूर : बंगळूरमधील राजाजीनगर येथे सात जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. सात जणांची हत्या केल्यानंतर आरोपी इंदुशेखर याला मृतांच्या आत्म्यांची भीती सतावू लागली होती. त्यामुळे त्याने संपूर्ण रात्र झोप न घेता घरातच देवाचे नामस्मरण करत घालवल्याचे तपासातून समोर आल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी आरोपीने पत्नी सुनीताला बेदम मारहाण केली होती. ‘तू मला का मारत आहेस?’ असा जाब पत्नीने विचारला असता, ‘तुझ्यामुळेच माझे आयुष्य आणि मानसिक शांतता उद्ध्वस्त झाली,’ असे म्हणत त्याने संताप व्यक्त केला होता. त्यानंतर घरातील जात्याच्या दगडाने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला बाथरूममध्ये ओढत नेले. तेथेही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचा मृत्यू झाल्याची खात्री होईपर्यंत तो तेथेच थांबला होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
या घटनेवेळी घरात असलेल्या अल्पवयीन मुलीने आईच्या मृतदेहाला गुंडाळण्यासाठी वडिलांना साडी आणि बेडशीट आणून दिल्याचेही वृत्त आहे. त्यानंतर आरोपीने मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
सात जणांची हत्या केल्यानंतर मृत व्यक्तींचे आत्मे आपल्याला त्रास देतील, या भीतीने आरोपी रात्रभर अस्वस्थ होता. घरात झोपणेही त्याला शक्य झाले नाही. त्यानंतर मुलीने त्याला धीर दिला. दोघांनी मिळून परिसरातील मंदिरांमध्ये जाऊन पूजा केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलीस कोठडीत असताना आरोपी वारंवार ‘माझा रक्तदाब वाढला आहे’, ‘चक्कर येत आहे’ आणि ‘मला विश्रांती हवी आहे’ असे सांगत असल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या प्रश्नांना तो इंग्रजीत उत्तरे देत असून, त्याच्या या वर्तनामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.
सात जणांच्या हत्येनंतर आरोपीच्या वर्तनाबाबत समोर येणाऱ्या या धक्कादायक बाबींमुळे प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta